A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

1 January 2011

वनसुधा (कृष्णाची वनक्रीडा)


(वसंततिलका)
बोले मुलांप्रति हरी पहिले दिशीं कीं
रात्रींच सिद्ध करणें अशनादि शिंकीं
जाऊ समस्तहि उद्यां वनभोजनातें
पोटांत भाव, वधणें अघदुर्जनातें II १ II


[द्रुतविलंबित]
खडबडोंनि समस्तहि धांवले
सहितवत्स हरीप्रति पावले
सकळ खेळति सोडुनि वासुरां
परम कौतुक जें गगनीं सुरां II २ II


[भुजंगप्रयात]
वनीं खेळती बाळ ते बल्लवांचे
तुरे खोंविती मस्तकीं पल्लवांचे
फुलांचे गळां घालिती दिव्य हार
स्वनाथासवें ते करीती विहार II ३ II

स्वकौशल्य त्या गुंजमाळांत नाना
गळां घालिती, ते करीती तनाना
शिरीं बांधिती मोरपत्रें विचित्रें
शरीरावरी रेखिती दिव्य चित्रें II ४ II


[द्रुतविलंबित]
हरिहि आपण त्यांतचि खेळतो
म्हणुनि वर्णितसे शुक खेळ तो
चहूंकडे करिती नवल क्षितीं
परि हरीसचि सर्वहि लक्षितीं II ५ II


[भुजंगप्रयात]
पहायास शोभा मृगां-काननाची
पुढें मूर्ति जातां मृगांकाननाची
गडी त्या चतुर्वक्त्रबापास हातीं
धरीतीच धांवोनि निष्पाप होती II ६ II


[उपजाति]
धांवोनि लावी पहिले करातें
श्रेष्ठत्व दे त्या अजि लेकरातें
जो तो म्हणे 'लाविन मीच पाणी
धरीन आधी प्रभु चक्रपाणी" II ७ II

परोपरी खेळति जी वनांत
अर्पूनि चित्तें जगजीवनांत
धरुनियां मर्कटपुच्छ हातीं
तयांसवें वृक्षिं उडों पहाती II ८ II

खगांचिया साउलिच्याच संगें
ते धांवती हास्यरसप्रसंगें
हंसाचिया दाखविती गतीतें
जे लाधले हंसगुरुगतीतें II ९ II


[भुजंगप्रयात]
मुखें वासुनी लोचन भ्रूतटातें
उभारुनियां वांकुल्या मर्कटांतें
अहो दाविती शब्द तैसे करीती
असे खेळती बाळ नि:शंक रीती II १० II

वनीं देखती मेघनीलास मोर
प्रमोदें करी नृत्यलीला समोर
तयासारिखे नाचती तोक सारे
खुणावूनि अन्योन्य कीं "तो कसा रे" II ११ II


[मालिनी]
उडत उडत चाले जेविं मंडूकजाती
उकड बसति तैसे त्यासवें तीव्र जाती
न बहु पसरितां ते हस्तपादादि, पाणी
तरति नवल पाहे हांसतो चक्रपाणी II १२ II


[भुजंगप्रयात]
वदे कृष्ण गोपाळबाळा जनांतें
"बसोनी करूं ये स्थळीं भोजनातें
वनीं वत्स सोडा चरायासि, पाणी
तयां पाजुनीयां" वदे चक्रपाणी II १३ II

"बरें कृष्णजी बोलसी तूं जसा रे
तसें वर्ततों लक्षितों तूज सारे"
असें जेविती सोडुनी वांसुरांतें
नभीं होय आश्चर्य सर्वां सुरां तें II १४ II


[मालिनी]
निजमुख कवणाही आड-दृष्टी असेना
रचुनि बसवि ऐशी भोंवतीं बालसेना
हरिवदन पहाया सर्व दृष्टी भुकेल्या
म्हणुनि बहुत पंक्ती मंडलाकार केल्या II १५ II


[इंद्रवजा]
संतोषतो नंदकुमार साचा
बाळांत तैशा परमा रसाचा
पंक्तीस दे लाभा अजी वनांत
बुद्धी जयांच्या जगजीवनांत II १६ II


[भुजंगप्रयात]
असे कर्णिका अंबुजामाजि जेवीं
मुलांमध्यभागीं बसे कृष्ण, जेवी
मुखीं ग्रास सप्रेम घालूनि हातीं
दहींभात दे, देव लीला पहाती II १७ II


[शार्दुलविक्रिडीत]
वंशी नादनटी तिला कटितटीं खोवूनि पोटीं पटीं
कक्षे वामपुटीं स्वशृंग निकटी वेताटिही गोमटी
जेवी नीरतटीं तरुतळवटीं, श्रीश्यामदेहीं उटी
दाटी व्योमघटीं सुरां सुख लुटी घेती जटी धूर्जटी II १८ II

 

— वामन पंडित (वामन नरहरी शेष)

3 comments:

Unknown said...

सुंदर,आम्ही शाळेत असताना अशा छान छान कविता आम्हाला मराठी अभ्यास क्रमात असायच्या.आम्ही त्या मराठी चा तास सुरू होण्यापूर्वी शिक्षक वर्गात येई पर्यंत म्हणत असू. चालीही सुंदर असत..त्यापैकी एक म्हणजे वनी खेळती बाळ ते बल्लवांचे ही कविता.

dndabke said...

वा, छान रचना. वाचून आनंद झाला. शाळा आठवली. किती वेगवेगळ्या छंदांचा उपयोग केला आहे. धन्य ते कवी.

scmthoughts said...

इयत्ता चौथीत असताना मुखोद्ग्गत आयुष्यातील पहिली कविता जी
वर्गात म्हणून मी आमच्या बाईन्ची शाबासकी मिळवली होती..खरंच खूपच सोनेरी दिवस होते ते!