A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

31 December 2011

माझी शाळा

ही आवडते मज मनापासुनी शाळा |
लाविते लळा ही, जसा माउली बाळा ||

हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी |
ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |
हासुनी, हसवुनी, खेळुनी सांगुनी गोष्टी |
आम्हांस आमुचे गुरूजन शिक्षण देती ||

हे प्रेम कराया किती भोवती भाऊ! |
हातांत घालुनी हात तयांच्या राहू |
येथेच बंधुप्रेमाचे, घ्या धडे |
मग देशकार्य करण्याला, व्हा खडे ||

पसरवा नाव शाळेचे, चहूकडे |
मग लोक बोलतील "धन्य धन्य ती शाळा |
जी देशासाठी तयार करिते बाळा !" ||
लाविते लळा ही, जसा माउली बाळा |
मज आवडते मनापासुनी शाळा ||


— प्र. के. अत्रे (केशवकुमार)

विश्वास ठेव

इतका वाईट नाही मी; जितका आज समजतेस
दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी; हे असे दिवस आले
आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत; तूच पदराचे शीड उभारलेस
हताश होऊन गोठलो; तूच पाठीवर हात ठेवलेस.

कसे जगलो आपण, किती सांगू, किती करून देऊ याद
पळे युगसमान भासली; नाही बोलवत, नको ती मोजदाद.

अशी उदास, आकुल, डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको
आधीच शरमिंदा झालो आहे; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही; हवीच तर घृणाही ठेव
ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.


-- नारायण सुर्वे (सनद)

30 December 2011

माझा हिंदुस्थान

माझा हिंदुस्थान, माझा हिंदुस्थान

हिमाचलाचे हीरकमंडित शिरभूषण भरदार
वक्षावर गंगा-यमुनांचे रुळती मौक्तिक हार
कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तलवार
महोदधीचे चरणाजवळी गर्जतसे आव्हान

पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी
गळ्यामधे गरिबांच्या गाजे संतांची वाणी
ज्योतीसम समरात जळाली झाशीची राणी
त्या संतांचे, त्या वीरांचे प्रियतम तीर्थस्थान

रात सरे ये प्राचीवरती तेजाची रेषा
नव्या मनूचा घोष घुमे हा दुमदुमतात दिशा
जागृत झाल्या दलित जगाच्या बलशाली आशा
स्वातंत्र्याचे समानतेचे उन्नत होय निशाण


- कुसुमाग्रज

26 December 2011

रानपांखरा !

रानपांखरा, रोज सकाळी येसी माझ्या घरा
गाणे गाउन मला उठविसी मित्र जिवाचा खरा.
शरीर निळसर, शोभे, झालर ठिपक्यांची त्यावरी
सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी II १ II

पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला,
अफाट आभाळांतुन, कैसे उडतां येते तुला ?
रात्र संपतां डोंगर चढुनी वर येतो भास्कर
तूंही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर II २ II

वाट चालुनी संद्याकाळी रवि सोडी अंबरा
आणि तूंही मग पंख उभारून जासी अपुल्या घरा.
सूर्यासंगे जासी येसी, सदाकदा कां बरें ?
शेजारीं आहेत काय रे परस्परांची घरें ? II ३ II

देह एवढा, अपाय कोणी करेल तुजला इथें
म्हणून कां तुज रवीबरोबर, माय तुझी धाडिते ?
सांगतोस का तिला कसा हा छानदार बंगला ?
होते का रे कधीं आठवण माझी सखया तुला ? II ४ II

तुझ्यासारखें जावें वाटे उडत मजेनें वरी
नेशिल का मज तुझ्या बिर्हाडी बसवुनि पंखावरी ?
माय तुझी येईल, सूर्यही येइल भेटायला,
मजाच होईल सख्या पांखरा, नेइं एकदा मला II ५ II


— गोपीनाथ

19 December 2011

शुकान्योक्ति

शुकान्योक्ति: १

[पृथ्वी]
फळें मधुर खावया असति, नित्य मेवे तसे,
हिरेजडित सुंदरीं कनकपंजरींहीं वसे,
अहर्निश तथापि तो शुक मनांत दु:खें झुरे,
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखातें स्मरे..

शुकान्योक्ति: २
[स्त्रग्धरा]
देखोनो नारळीचा तरु, शुक भुलला एक त्याच्या फळाला,
साळीचें शेत मोठें झडकरि पिकलें सोडुनी तो निघाला,
त्यांनें त्या नारळातें फिरुनि फिरुनियां फोडण्या यत्न केला,
आशेचाची न तेणें परि बळकटही चंचुचा भंग झाला.

शुकान्योक्ति: ३
[मालिनी]
बळकट पिंजराही तूज नाहीं बसाया,
फिरति बहुत बोके द्वाड भारी घरीं या,
परिसुनि तव वाणी पामरां सौख्य नाहीं,
म्हणुनि दिवस कांही मौन सेवून राही.



— कृष्णशास्त्री चिपळूणकर

16 December 2011

दिन दिन दिवाळी


दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी

गाई म्हशी कोणाच्या?
लक्ष्मणाच्या

लक्ष्मण कोणाचा?
आई बापांचा

दे माय खोबर्‍याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी



(अनभीज्ञ)


14 December 2011

केकावली (निवडक)

(पृथ्वी)

पिता जरि विटे, विटो; न जननी कुपुत्री विटे;
दयामृतरसार्द्रधी न कुलकज्जले त्या किटे;
प्रसादपट झांकिती परि परा गुरूंचे थिटे;
म्हणूनि म्हणती भले, न ऋण जन्मदेचें फिटे ॥ २२ ॥

तुम्ही बहु भले, मला उमज होय ऐसे कथा;
कसा रसिक तो, पुन्हा जरि म्हणेल आली कथा
प्रतिक्षण नवीच दे रुचि शुकाहि संन्यासिया;
न मोहिति भवत्कथा अरसिका अधन्यासि या ॥ २३ ॥

तुझें यशचि तारितें परि न केवला तारवे;
सहाय असिला असे, तरिच शत्रूला मारवे;
न भागवत भेटतां, न घडतांहि सत्संगती
न अज्ञहृदयें तशीं तव यशोरसी रंगती ॥ २४ ॥

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो
कळंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो,
सदन्घ्रिकमळी दडो; मुरडिता हटानें अडो
वियोग घडता रडो; मन भवच्चरित्री जडो ॥ २५ ॥

न निश्चय कधी ढळो; कुजनिविघ्नबाधा टळो,
न चित्त भजती चळो; मति सदुक्तमार्गी वळो,
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो,
पुन्हा न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो ॥ २६ ॥

मुखी हरि ! वसो तुझी कुशळधामनामावली,
क्षणांत पुरवील ती सकल कामना, मावली;
कृपा करिसि तू जगत्सयनिवास दासांवरी,
तसी प्रकट हे नीजश्रितजनां सदा सांवरी ॥ २७ ॥

दयामृतघना ! अहो ! हरि ! वळा मयूराकडे,
रडे शिशु, तयासि घे कळवळोनि माता कडे
असा अतिथि धार्मिकस्तुतपदा ! कदा सांपडे ?
तुम्हां जड भवार्णवी उतरितां न दासां पडे ॥ २८ ॥



— मोरोपंत (मोरेश्वर रामचंद्र पराडकर)

वास्तविक केकावलीमध्ये जवळ जवळ १२२ श्लोक आहेत, त्यातील काही निवडक इथे देण्यात आले आहेत.

नलराजा आणि हंस (भाग १)

'नलदमयंती स्वयंवर' या सुमारे २२५ ते २५० श्लोकांच्या आख्यानातून काही निवडक वेचेपाठ्यपुस्तकांमध्ये घेतलेले असतात. काही संस्मरणीय वेचे एकत्र करून इथे तीन भागांत विभागून दिलेले आहेत.


[शार्दुलविक्रीडित]
पुण्य-श्लोक नृपावळींत पहिला होवोनी जो राहिला
जो राजा असतां समस्त महिला विश्रांती शेषाहिला
व्यासोक्ते अवगाहिला बुधजनी नानागुणी गायिला
जो नामें नळ तत्कथौघ लिहिला तो पाहिजे पहिला ll १ ll


[दिंडी]
कथा बोलूं हे मधुर सुधा-धारा
होय शृंगारा करुण रसा थारा
निषधराजा नळनामधेय होता
वीरसेनाचा तनय महाहोता ll २ ll


[वसंततिलका]
चंद्रासि लागति कळा उपराग येतो
गंगेसि भंग बहु पाणउतार होतो
जें होय चूर्ण तरि मौक्तिक तें कशाला
नाही समान नळराजमहायशाला ll ३ ll


[शिखरिणी]
कदा नेणों वोढी शरधिंतुनि काढी शर कदा
कदा धन्वीं जोडी वरि वरिही सोडी तरि कदा
वि-पक्षाच्या वक्षावरि विवर-लक्षास्तव रणीं
कळे राजेंद्राची त्वरित शरसंधानकरणी ll ४ ll


[शार्दुलविक्रीडित]
जो धैर्ये धरसा सहस्त्रकरसा तेजें तमा दूरसा
जो रत्नाकरसागभीर, शिरसा भूपां यशोहारसा
ज्ञाता जो सरसावला, नवरसांमाझारि शृंगारसा
शोभे तामरसाक्ष तो नळ रसानाथ स्तवूं फारसा ll ५ ll


[माल्यभारा]
नळराजकथा सुधाचि साजे
दमयंती वरवर्णिनी विराजे
मिळणी उभयांसि होय जेथें
अधिकारी अधिकानुराग तेथें ll ६ ll


[वसंततिलका]
गंगातरंगसम जो निज देहवर्णी
भृंगापरी रुचिर कांति जयासि कर्णी
जंघाल जो पवनसंगतिची सवे घे
शृंगारिला हय तयावरि भूप वेधे ll ७ ll

जो अंबरी उफळतां खुर लागलाहे
तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
जो या यशास्तव कसे धवलत्व ने घे ?
शृंगारिला हय तयावरि भूप वेधे ll ८ ll


[दिंडी]
सवें सेना भूपाळ निघालाहे
शींव लंघी उद्यान एक पाहे
रिघे तेथे मित सेवकांसि बाहे
फौज सारी बाहेर उभी राहे ll ९ ll

पनस जंबू जंबीर विविध निंबे
कुंद चंदन माकंद सुदाडिंबे
तुंग नारिंगें विकसली कदंबें
वसति तेथें शुकसारिकाकदंबें ll १० ll

[वंशस्थ]
लते-तळी रुंद निरुंद कालवे
गळोनि तेथें मकरंद कालवे
परागही सांद्र तयांत रंगती
फुलांसवे भृंगतती तरंगती ll ११ ll


[आर्या]
उपरि सकंटक साचे परंतु सांचे जयांत सुरसाचे
घोंस असे फणसांचे षण्मासांचे कितेक वरसाचे ll १२ ll



— रघुनाथ पंडित (रघुनाथ गणेश नवहस्त/नवाथे)

इथे पाठ्यपुस्तकातील निवडक वेचे एकत्र करून तीन भागांत विभागून दिलेले आहेत त्यांतील हा पहिला भाग आहे.

नलराजा आणि हंस (भाग २)


(उपेंद्रवज्रा)
तया वनी एक तटाक तोये
तुडुंबले; तामरसानपाये
निरंतरामंद मरंद वाहे
तपातही यास्तव रिक्त नोहे ll १३ ll

(द्रुतविलंबित)
अमृतही पयही म्हणवितसे
उभय होय तसी रुचि वितसें
मधुर सारस तें जल गा तसें
मधुर सारस यास्तव गातसे ll १४ ll

(वसंततिलका)
पीतां मरंद उदरंभर बंभराचें
जें होय मंदिरही सुंदर इंदिरेचें
जें पद्म तेथिल सहस्र–दळा धरीतें
प्रत्यक्ष सूर्यकिरणांस विसाववीतें ll १५ ll

(दिंडी)
तया कासारी राजहंस पाहे
राजहंसाचा कळप पोह्ताहे
तयासाठी हे वापिकाच पोहे
नळे केली हें कोण म्हणे नोहे ll १६ ll

तया हंसांचे देह कांचनाचे
पक्ष झळकती वीज जशी नाचे
रंग माणिकसे चंचुचे पदांचे
जसे अधरीचे भीमकन्यकेचे ll १७ ll

(वसंततिलका)
त्यांतील एक कलहंस तटीं निजेला
जो भागला जल-विहार विशेष केला
पोटीच एक पद, लांबविला दुजा तो
पक्षीं तनू लपवि भूप तया पहातो ll १८ ll

टाकी उपानह पदें अतिमंद ठेवी
केली विजार वरि डौरहि, मौंन सेवी
हस्ती करी वलय उंच अशा उपायीं
भूपें हळूच धरिला कलहंस पायीं ll १९ ll

(मालिनी)
कलकल कलहंसे फार केला सुटाया
फडफड निजपक्षीं दाविलें कीं उडाय
नृपतिस मणिबंधी टोंचिंता होय चंचू
धरि सुदृढ़ जया तो काय सोडील पंचू " ll २० ll

तदितर खग भेणें वेगळाले पळाले
उपवनजलकेली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशीं नसे तो
कठिन समय येतां कोण कामास येतो ll २ ll 



— रघुनाथ पंडित (रघुनाथ गणेश नवहस्त/नवाथे)


इथे पाठ्यपुस्तकातील निवडक वेचे एकत्र करून तीन भागांत विभागून दिलेले आहेत त्यांतील हा दुसरा भाग आहे.

नलराजा आणि हंस (भाग ३)


[दिंडी]
न सोडी हा नळ भूमि-पाळ माते
असें जाणोनी हंस वदे त्यातें
"हंसहिंसा नच घडो तुझ्या हातें,
सोड, राया, जाईन स्वस्थळातें ll २२ ll

"जागजागीं आहेत वीर कोटी
भले झुंजारहि शक्ति जयां मोठी,
तयां माराया धैर्य धरी पोटी;
पांखरू हे मारणे बुद्धि खोटी ! ll २३ ll

"वधुनी माझी हे कनकरूप काया,
कटकमुकुटादिक भूषणे कराया
कशी आशा उपजली तुला राया ?
काय नाही तुजला दया माया ? ll २४ ll

(शार्दुलविक्रीडित)
"म्हातारी उडतां नयेचि तिजला माता मदीया अशी;
कांता काय वदो ? नवप्रसव ते सातां दिसांची तशी;
पाता त्या उभयांस मी; मज विधी घातास योजितसे !
हातामाजि नृपा तुझ्या गवसलों, आतां करावे कसे ? ll २५ ll

[पद]
"हरहर सांपडलों, सापडलों ! कैसा फांशी पडलों
इतर नदी जलटांकी, टाकुनि आलों याच तटाकीं
सोडुनि मानसकेली, कापुनि घ्याया आलों शेली
ठेविन तव पदीं माथा, आतां सोडविं मज रघुनाथा ll २६ ll

[मालिनी]
"सदय ह्रदय याचे, भूप हा तापहारी,
म्हणुनि परिसतां मी होय एथे विहारी;
मजहि वध कराया पातकी पातला जो,
वरूनि पति असा ही भूमि कैशी न लाजो ?" ll २७ ll

[वसंततिलका]
एणेपरी परिसतां अतिदीन वाचा,
हेलावला नळ पयोधि दयारसाचा;
सोडी, म्हणे, "विहर जा अथवा फिराया
राहें यथानिज मनोरथ हंसराया ll २८ ll

[मालिनी]
सुटुनि खग पळाला, बैसला शालशाखे,
क्षणभरि निज देही मुक्तिविश्रांति चाखे;
स्वजन तव तयाचे भोंवताली मिळाले,
कवळिती निजबंधू, बाष्पबिंदू गळाले ll २९ ll

[शिखरिणी]
विसांवा घे कांही, उडुनि लवलाही परतला,
नृपाळाच्या स्कंधी बसुनि मणिबंधी उतरला
म्हणे हंस, क्षोणीपतिस, "तुज कोणी सम नसे,
दयेचा हा ठेवा तुजजवळीं देवा, वसतसे. ll ३० ll

[दिंडी]
"ऐक राया, तूं थोर दयासिंधू,
नीतिसागरही, तूंचि दीनबंधू;
निखंदोनी बोलिलो नको निंदू,
सकल वदसी जरि पाय तुझे वंदू ll ३१ ll

"पारधीमाजी खगा मृगा राजे
करिति हिंसा जी तीच बरी साजे
तुवां दिधली मज मोकळीक, बा जे
दया केली ही कीर्ति तुझी गाजे ll ३२ ll

"हंस मिळणे हें कठिण महीलोकी,
सोनियाचा तो नवल हें विलोकी;
तशा मजलाही सोडिले तुवां कीं,
तुझा ऐसा उपकार मी न झांकीं ll ३३ ll

"किति रावे असतील तुझ्या धामी,
किति कोकिलही, सारिका, तसा मी.
चित्त लागियले तूझिया लगामीं,
नृपा, योजी मज आपुलिया कामीं ll ३४ ll

"तुझा करपंजर होय मला थारा
तुझ्यां वचनांचा ओघ दुग्धधारा
तुझे मानस बहु थोर गा उदारा
सत्य लोकेशहि तूंचि गुणागारा ll ३५ ll

[वसंततिलका]
"हें पांखरूं मजसि येइल काय कामा,
ऐसे, नृपा, न वद, पूरितलोककामा;
मोले उणे व्यजन ते धरितां पुढारीं
छाया करी, तपनदीप्तिसही निवारी !" ll ३६ ll



— रघुनाथ पंडित (रघुनाथ गणेश नवहस्त/नवाथे)


इथे पाठ्यपुस्तकातील निवडक वेचे एकत्र करून तीन भागांत विभागून दिलेले आहेत त्यांतील हा तिसरा भाग आहे.

12 December 2011

एक खेडें

(जाति – दिंडी)

सह्यगिरिच्या पायथ्याला सुपीक
रम्य खोरें कोंकणामधीं एक;
नदी त्यामधुनी एक वाहताहे,
एक खेडें तीवरी वसुनि राहे. ll १ ll

वदनि सुंदर मंदिरें न त्या ठायीं,
परी साधीं झोपडीं तिथें पाहीं;
मंदिरांतुनि नांदते रोगराई,
झोपडयांतुनि रोग तो कुठुनि राही ? ll २ ll

रोग आहे हा बडा कीं मिजासी,
त्यास गिर्द्यांवरि हवें पडायासी;
झोंपडयांतील घोंगडयांवरी त्यास,
पडुनि असणें कोठलें सोसण्यास ? ll ३ ll

उंच नाहिंत देवळें मुळी तेथें,
परी डोंगर आहेत मोठमोठे;
देवळीं त्या देवास बळें आणा,
परी राही तो सृष्टिमधें राणा. ll ४ ll

उंच डोंगर ते, उंच कडे भारी,
पडे धो! धो! ज्यांचियावरुनि वारी,
भोंवतालें रान तें दाट आहे;
अशा ठायीं देव तो स्वयें राहे ! ll ५ ll

स्तोत्र ओढे थांबल्यावीण गाती,
सूर वारे आपुला नित्य देती,
वृक्षगण तो हालुनी डुल्लताहे;
अशा भक्तीच्या स्थळीं देव राहे ! ll ६ ll

अशी नैसर्गिक भव्यता उदास
तया खेडयाच्या असे आसपास;
तसा खेडयाचा थाट तोहि साधा
भव्यतेला त्या करितसे न बाधा. ll ७ ll

सरळ साधेपण, असे निसर्गाचें
मूल आवडतें; केंवि तें तयाचें
भव्यतेला आणील बरें बाधा ?
निसर्गाचा थाटही असे साधा. ll ८ ll

लहान्या त्या गांवांत झोंपड्यां
भले कुणबी लोक ते राहतात;
खपोनीयां ते सदा सुखें शेतीं,
सरळ अपुला संसार चालवीती. ll ९ ll

अहा ! अज्ञात स्थळीं अशा, मातें,
एक गवतारु खोप रहायातें,
शेतवाडी एक ती खपायाला,
लाधतीं, तर किति सौख्य मन्मनाला ! ll १० ll

तरी नसतों मी दरिद्री धनानें,
तरी नसतों मी क्षुद्र शिक्षणानें,
तरी होतीं तीं स्वर्गसुखें थोडी,
तरी नसती कीर्तिची मला चाडी ! ll ११ ll

कीर्ति म्हणजे का हो ? – एक शिंग:
प्रिय प्राणांहीं आपुलियां फुंक,
रखाडीला जा मिळूनियां वेगे;
शिंगनादहि जाईल मरुनि मागें ! ll १२ ll

कीर्ति म्हणजे काय रे ? – एक पीस :
शिरीं लोकांच्या त्यास चढायास,
छरे पडती पक्ष्यास खावयास;
मागुनी तें गळणार हेंहि खास ! ll १३ ll

पुढें माझें चालेल कसें, ऐशी
तेथ चिंता त्रासिती न चित्तासी;
नीच लोकांला मला नमायास
वेळ पडती थोडीच त्या स्थळास ! ll १४ ll

शेत नांगरणें, पेरणें सुखानें,
फूलझाडें वाडींत शोभवीणें;
गुरें-ढोरें मी बाळगुनी कांही,
दूधदुभतें ठेवितों घरीं पाहीं. ll १५ ll

कधीं येता पाहुणा जर घराला,
'तुझे घर हें' वदतोंच मी तयाला;
गोष्टि त्याच्या दूरच्या ऐकुनीयां,
थक्क होतों मी मनीं तया ठाया — ll १६ ll

“असे जग तें एवढें का अफाट !
त्यांत इतुका का असे थाटमाट !”
असें वदतों मी त्यास विस्मयेंसी,
स्वस्थिती तरि तुळितों न मी जगाशीं ll १७ ll

स्वर्गलोकीं संपत्ति फार आहे,
इथें तीचा कोट्यश तोहि नोहे;
म्हणुनि दु:खानें म्हणत ‘हाय ! हाय !’
भ्रमण अपुलें टाकिते धरा काय ? ll १८ ll

तरी, स्वपथा जातात सोडुनियां,
कुणी तारे तेजस्वि फार व्हाया;
तधीं तेजाचा लोळ दिसे साचा,
परी अग्नी तो त्यांचिया चितेचा ! ll १९ ll

वीरविजयांच्या दिव्य वर्तमानीं
कृष्ण कदनें पाहतों न त्या स्थानी;
भास्कराच्या तेजाळपणीं मातें
डाग काळे दिसते न मुळीं तेथे ! ll २० ll

सूर्यचंद्रादिक दूर इथुनि तारे,
तसें जग हें मानितों अलग सारें;
जसे सेच्छूं त्यांवरी चढायास,
इच्छितों नच या जगीं यावयास ! ll २१ ll

तेथ गरजा माझिया लहान्या त्या
सहजगत्या भागुनी सदा जात्या;
म्हणुनि माझें जग असें तेंचि खोरें
सुखी मजला राखितें चिर अहा रे ! ll २२ ll



— केशवसुत

सौजन्य : केशवसुत डॉट कॉम

10 December 2011

कोळ्याचा प्रयत्न


[अभंग]
एका कोळियानें एकदां आपूलें l
जाळें बांधियेलें उंच जागीं ll
तेथुनी सुखानें खालतीं तो आला l
परी मग झाला कष्टी बहू ll
मागुती जाळीया-माजीं जातां ये ना l
धाग्यावरुनी पुन्हां पुन्हां पडे ll १ ll

[कामदा]
चार वेळ तो ह्यापरी पडे l जाय बापुडा भागुनी, पुढें ll
आस खुंटली, येतसे रडें l अंग टाकुनी भूमिसी पडे ll २ ll

[अंजनी गीत]
फिरुनि एकदा धीर धरुनियां l
लागे हळुहळु वरतिं चढाया ll
जाळ्याजवळी परि पोंचुनियां l
आदळला खालीं ll ३ ll

[साक्या]
पांचहि वेळा यत्न करुनियां, आलें यश न तयाला ll
गरिब बापुडा कोळी तेव्हां, दु:खी अतिशय झाला ll ४ ll

हिंमत धरुनी फिरुनि आणखीं, धागा चढुनी गेला ll
परि जाळ्यामधिं शिरतांना तो, झोक जाउनी पडला ll ५ ll

[दिंडी]
"अहा ! मज ऐसा दैव-हत प्राणी l
खचित जगतीं या दिसत नसे कोणी !"
निराशेनें बोलुनी असें गेला l
परी चित्तीं स्वस्थता न ये त्याला ! ll ६ ll

[अभंग]
मग वेगें वेगें उठे l धागा चढूं लागे नेटें ll
बहु घेई खबरदारी l जाई, पोंचे जाळ्यावरी ll
हळुच मग आंत शिरे l पोटीं आनंदानें भरे ll
झटे निश्चयाचे बळें ! अंतीं त्याला यश मिळे ll ७ ll



(कवी : अज्ञात)

(मूळ इंग्रजी कवितेंचा मराठी अनुवाद केलेली ही साक्या, दिंडी, कामदा, अभंग वृतातील कविता)

हिरकणी

गोपनारी हिरकणी गडा गेली
दूध घालाया परत झणी निघाली
पायथ्याशी ते वसे तीचे गाव
घरी जाया मन घेई पार धाव ll ध्रु ll

शिवप्रभुंचा निर्बंध एक होता
तोफ व्हावी अस्तास सूर्य जाता
सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे
कुठे कोणा जाऊ-न-येऊ द्यावे ll १ ll

सर्व दरवाजे फिरून परत आली
तिला भेटे ना तेथ कुणी वाली
कोण पाजील तरी तान्हुल्यास आता
विचारे या बहुदु:ख होय चित्ता ll २ ll

मार्ग सुचला आनंद फार झाला
निघे वेगे मग घरी जावयाला
नसे रक्षक ठेविला जेथ ऐसा
तेथ होता पथ रायगडी खासा ll ३ ll

गडा तुटलेला कडा उंच नीट
घरी जाया उतरली पायवाट
पाय चुकता नेमका मृत्यु येई
परी माता ती तेथुनीच जाई ll ४ ll

उतरू लागे मन घरी वेधलेले
शुद्ध नाही जरी तनुस लागलेले
अंग खरचटलेले वस्त्र फाटलेले
अशा वेषे ती घराप्रति चाले ll ५ ll

वृत्त घडले शिवभूप कर्णि जाता
वदे आनंदे धन्य धन्य माता
ड्यावरती त्या बुरुज बंधियेला
नाव दिधले हिरकणी बुरुज त्याला ll ६ ll


— अज्ञात

9 December 2011

श्रीमहाराष्ट्रगीत

मंगल देशा ! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्रदेशा॥ धृ.॥

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन, कांचन, करवंदीच्या कांटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी
निशाणावरी,
नाचते करी;
जोडी इहपरलोकांसी
व्यवहारा परमार्थासी
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्रदेशा ॥ १ ॥

अपर सिंधुच्या भव्य बांधवा ! महाराष्ट्रदेशा
सह्याद्रीच्या सख्या ! जिवलगा ! महाराष्ट्रदेशा
पाषाणाच्या देही वरिसी तूं हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जें तुझ्या अंतरीं..... ॥ २ ॥

भिन्न वृतिंची भिन्न भिन्न हीं एक जीवसत्वें
तुझिया देहीं प्रकट दाविती दिव्य जीवतत्वे
चित्पावन बुध्दीने करिसी तूं कर्तबगारी
देशस्थाच्या खुल्या दिलाची तुजला दिलदारी
कायस्थाचें इमान फिरवी रक्ताचा फेर
ठाक मराठी मनगट दावी तुझें हाडपेर
ध्येय जें तुझ्या अंतरीं..... ॥ ३ ॥

ठायीं ठायीं पांडवलेणीं सह्याद्रीपोटीं
किल्ले सत्तावीस बांधिले सह्याद्रीपाठीं
तोरणगडचा, प्रतापगडचा, पन्हाळगडिंचाही
लढवय्या झुंझार डोंगरीं तूंच सख्या पाही
सिंधुदुर्ग हा, विजयदुर्ग हा, ही अंजनवेल
दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल
ध्येय जें तुझ्या अंतरीं..... ॥ ४ ॥

तुझ्या भुकेला वरी नागली आणि कणीकोंडा
वहाण पायीं अंगिं कांबळी उशाखालिं धोंडा
विळा कोयता धरी दिगंबर दख्खनचा हात
इकडे कर्णाटक हांसतसे, तिकडे गुजरात
आणि मराठी भाला घेई दख्खन् - कंगाल
तिकडे इस्तंबूल थरारे, तिकडे बंगाल
ध्येय जें तुझ्या अंतरीं..... ॥ ५ ॥

रायगडावर माय जिवाची गवळण बिनधोक
झोंक हिरकणी नांव ठेवुनी जाइ रोखठोक
करीत पावन अर्पुनि पंचप्राणांचा पिंड
हिरडस-मावळचा श्रीबाजी, ती पावनखिंड
करी रायगड रायरिचा तो जिजाइचा तान्हा
कोंढाण्याचा करी सिंहगड मालुसरा तान्हा
ध्येय जें तुझ्या अंतरीं..... ॥ ६ ॥

रसवंतीच्या पहिल्या बाळा मुकुंदराजाला
पहिलावहिला अष्टांगांनीं प्रणाम हा त्याला
शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरिच्या देशा
पुंडलिकाच्या, शिवरायांच्या, टिळकांच्य देशा
अनंत कोटी ग्रंथ रचुनियां जोडि तुझ्या नामा
वाल्मीकीचें शतकोटी यश विष्णुदास नामा
ध्येय जें तुझ्या अंतरीं..... ॥ ७ ॥

मयूर कविच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा
कवि कृष्णाच्या* निर्यमका हे महाराष्ट्र देशा
देवी ज्ञानेश्वरी करि जिथें भक्तीचा खेळ
तिथेंच गीतारहस्य बसवी बुध्दीचा मेळ
जिथें रंगलीं साधींभोळीं जनाइचीं गाणीं
तिथेंच खेळे श्रीपादांची* कलावती वाणी
ध्येय जें तुझ्या अंतरीं..... ॥ ८ ॥

विकावयाला अमोल असली अभंगमय वाणी
करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी
तुला जागवी ऐन पहांटे गवळी गोपाळ
धार दुधाची काढित काढित होनाजी बाळ
मर्दानी इष्काचा प्याला तुझा भरायासी
उभा ठाकला सगनभाउ हा शाहुनगरवासी
ध्येय जें तुझ्या अंतरीं..... ॥ ९ ॥

प्रभाकराची जडणघडण कडकडित म्हणायाला
दो हातांचा मुजरा माझा तुळशीरामाला
भीमथडीहुनि चहुंमुलखांवर फिरले धारकरी
भीमथडीवर चहुंमुलखांतुनि जमले वारकरी
आळंदीच्या ज्ञानोबांची भिंत घेत धांव
पुंडलिकाचे नांव चालवी दगडाची नाव
बोलघुमट घुमवीत सारखा नवलाची भाक
जेजूरीवर चढी पायरी उभी नऊ लाख
ध्येय जें तुझ्या अंतरीं..... ॥ १० ॥


- गोविंदाग्रज


* केशवसुत
* श्रीपाद कोल्हटकर

तळटीप :
१) पाठ्यपुस्तकामध्ये कवितेच्या अखेरीस 'अपूर्ण' असा उल्लेख असलेली पण मूळ दहा कडव्यांची संपूर्ण संहिता इथे घेतली आहे.
२) 'वसंत देसाई, यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत 'जयवंत कुलकर्णी' व इतर मंडळींनी सुध्दा पूर्ण गायीलेले नाही.

8 December 2011

तूं तर चाफेकळी

" गर्द सभोंतीं रान साजणी, तूं तर चाफेकळी !
काय हरवलें सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी ? " ॥ ध्रु ॥

ती वनमाला म्हणे " नृपाळा, हें तर माझें घर;
पाहत बसतें मी तर येथें, जललहरी सुंदर,
हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.
घेउनि हातीं गोड तिला त्या कुरणावरतीं फिरे—
भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरें " ॥ १ ॥

" रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी ! तुला;
तूं वनराणीं, दिसे न भुवनीं तुझिया रुपा तुला
तव अधरावर मंजुळ गाणीं, ठसलीं कसलीं तरी ;
तव नयनीं या प्रेमदेवता धार विखारी भरी !
क्रिडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझें हें गडे,
भुरुभुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालांवरी;
भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं. " ॥ २ ॥

सांज सकाळीं हिमवंतीचे सुंदर मोतीं घडे;
हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे.
ती वनमाला म्हणे नृपाळा " सुंदर मी हो खरी " ॥ ३ ॥


— बालकवी

तळटीप : मत्स्यगंधा (१९६४) नाटकातले हे गीत आशालता वाबगावकर यांनी पूर्ण गायीलेले नाही.

7 December 2011

आमची मांजरी

[शार्दूलविक्रीडित]

शोभे वर्तुल तोंड गोंडस जिचें, नासाप्रभा तांबडी
डोळे नीलविलोल गोल दिसती प्रत्यक्ष पाचू खडी;
जीचे छान लहान कान गमती गोकर्णिकेचीं फुलें,
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll १ ll

भाटी हे, परि नीट लांब फुटती ओठीं मिशा पांढर्‍या;
अंगी लोंकर फार ती मृदु उशी ही सांवरीची खर्‍या,
कोठें लाल, मधून शुभ्र ठिपके देहीं जिच्या शोभले,
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll २ ll

वाटे शेंपुट लांब फार मृदुसें रेशीम-गोफापरी;
रागानें परि त्यास जी फुगवितां येते ब्रशाची सरी,
जातां धांवतही कधींहि न जिचीं तीं वाजती पावलें,
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll ३ ll

पंजे शुभ्र जिचे असून वरतीं काळीं नखे भासती
जेवीं पूर्ण-शशांक-बिंबि दिसती ते डाग रम्याकृती,
पट्टा चंदन-शुभ्र गंध जणुं हें भाळीं असे रेखिले
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll ४ ll

आणी दूध जधीं सकाळिं गवळी, येई तधीं धावुनी,
त्याचे भोंवती नाचुनी शिरुनियां पायीं तनू घासुनी
‘म्यां म्यां’ ओरडुनी सुखें पय पिई जें भूवरी सांडलें
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll ५ ll

येतां अंबररत्नबिंब उदया जाऊन कौलांवरी,
घेवोनी नवमित्ररश्मि अपुल्या देहीं, सुखातें वरी,
तेथें निर्मल सर्व अंग करिते जी चाटुनी आपुलें,
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll ६ ll

नेमें साधुनि भोजनावसर जी बैसोनि पानापुढे
राही स्वस्थ भली उगाच न पळे पंक्तींत चोहोंकडे,
घालूं भूवर भात खात तितका, चित्राहुती ना गिळे
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll ७ ll

खोडी एक परंतु होय तिजला, सोडी न तीतें जरा,
नाहीं तूप, न भात खात अगदीं कांहिंहि तुम्ही करा;
हुंगोनी नुसतेंच अन्न बसते राही उपाशी बळें,
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll ८ ll

होतां भोजन अंगणीं मग तनू टाकूनियां आडवी
डोळे झांकुन, शांत निश्र्चल मनें चारी पदां लांबवी
साधूनी स्वसमाधि साधुस असे मागें जिनें टाकिलें,
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll ९ ll

ऐशी घेउनियां जरा सुखकरा जी नित्य विश्रांतिला
डोळ्यांतें उघडी, पदांस अखडी, सोडीच भूमीतला
देई जांभइ जी उठूनि तनुला देवोनि आळेपिळे
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll १० ll

पाहोनी मग अंगणांत चिमणी घाली झणीं झांपडी
जातां ती उडुनी हताश बनुनी बैसे धरोनी दडी
लावी निश्र्चल अंगणीं टक, जिचें क्रोधें मन क्षोभलें
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll ११ ll

येंता ती चिमणी पुन्हां उचलुनी जी मागले पाय ते
घेई भार पदीं पुढील, सहसा वेगें उडी मारते
जातां भक्ष्य परी भरारुनि, जिचें हो तोंड ओशाळलें
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll १२ ll

केव्हा पुच्छ धरी पुढील चरणीं चावी स्वदंतांकुरें
येतांची कळ तें त्यजी गरगरां नाचे, स्फुरे, गुर्गुरे;
भूमीते खरडी स्वकीय नखरीं मध्येंच जोरें पळे,
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll १३ ll

राहेना पळही कधीं चपळ जी एके स्थळीं सुस्थिर,
धांवे धूम, उडे, मधेंच उसळे; धुंडीत सारें घर,
चाळे दाखविते अनेक, धरिती पाठीस जेव्हां मुलें,
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll १४ ll

कांहीं खुड्खुड्लें, तरी धडपडे, नाचे पडे बागडे,
कोठें आड दडे, मधें वर उडे, घे धांव चोहोंकडे,
जी झाडावर वेंधतां खग-कुळें होती भय-व्याकुळें;
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll १५ ll

रात्रीं जी न मनी जुमानित तमा धैर्यें फिरे मंदिरीं,
टेहाळी करि, संधि साधुनि उडी टाकावया उंदिरीं;
या कृत्यें ज्वर-राज-मानसिं जणूं शल्यापरी जी सले !
ऐशी सुंदर मांजरी बघुनियां मच्चित्त हें लोभलें ll १६ ll


— बाळकृष्ण अनंत भिडे

2 December 2011

कोकिलान्योक्ति

[वसंततिलका]

येथें समस्त बहिरे वसताति लोक,
कां, भाषणे मधुर तूं करिशी अनेक.
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक,
वर्णावरून तुजला गणतील काक. ll १ ll


[शार्दूलविक्रीडित]

या माळावरि वृक्ष एकहि नसे, बाळा खुळ्या कोकिला,
येथें मंजुळ शब्द काढुनि गळा कां शोषिशी आपुला ?
जेथें बोल अमोल वाटति तुझे, तो देश, बा वेगळा;
तेथें आम्र फुलोनि गंध विखरे चोहिंकडे आगळा. ll २ ll



[पृथ्वी]

वसंतसमयीं फुले, परिमळें दिशा व्यापि जो,
जयास अवलोकुनी सुरतरूहि चित्तीं थिजो,
तया सतत सेविती विहग आम्रवृक्षा किती;
परी पिकचि एकला मधुर वाणि लाधे कृती. ll ३ ll



[शार्दूलविक्रीडित]

कां, बा, सुस्वर शब्द काढिशि पिका ? राहें उगा; काळ हा
लोटेतों तरुकोटरीं लपुनियां कोठें तरीही रहा.
पानें तीव्र हिमें गळोनि दिसती झाडें जळाल्यापरी,
गर्जे कर्कश शब्द थोर करुनी काकावली त्यांवरी. ll ४ ll



— कृष्णशास्त्री चिपळूणकर

गजान्योक्ती

[स्त्रग्धरा]
ज्याची स्पर्धा कराया इतर गज कधीं शक्त नाहीच झाले,

सांगावे काय ? ज्याच्या मृगपतिहि भयें रान सोडून गेले,

तो पंकामाजिं आजि गजवर फसला, युक्ति नाहीं निघाया,

अव्हेरीती, पहा, हे कलकल करुनी क्षुद्र कोल्हे तयाला.


 कृष्णशास्त्री चिपळूणकर

मयूरान्योक्ति

मयूरान्योक्ति : १
[शार्दूलविक्रीडीत]

झाडें पेटुनि वाजती कडकडां, त्यांचा ध्वनी होतसे,
ज्वाला राहुनि राहुनी उठति या विद्युल्ल्ता ही नसे,
काळा धूर नभीं बहू पसरला, हा मेघ नोहे खरा,
वर्षाकाळ न हा, दवानल असे, मोरा, पळें, रे, घरा.


मयूरान्योक्ति : २

[शार्दूलविक्रीडीत]

रत्नांचा जणुं ताटवा झळकतो, मोरा, पिसारा तुझा,
हर्षे नाचशि तै गमे त्रिभुवनीं पक्षी न ऐसा दुजा,
मोठा सुंदर तूं खरा परि दया नाहींच भिल्लांस या,
हे घेतील तुझा जिवा, झडकरी सोडीं अरण्यास या.




— कृष्णशास्त्री चिपळूणकर

बाभळीविषयीं अन्योक्ति

[शार्दूलविक्रीडीत]

कांट्यांनीं भरलें शरीर अवघें, छाया नसे दाटही,

नाहीं वास फुलांस, भूक न निवे ज्याच्या फळें अल्पही,

नाहीं एकहि पांथ येत जवळीं तूझ्या, असो गोष्ट ही

अन्याचीं न फळें मिळोत म्हणुनी होशी तयांतें वही.



 कृष्णशास्त्री चिपळूणकर

हरिणान्योक्ती


[शार्दूलविक्रिडित]

जाळे तोडुनियां बळें हरिण तो टाळोनि दावाग्निला

व्याधाचे चुकवूनि बाणहि महावेगें पुढें चालिला,

तों घाईंत उडी फसूनि पडला आडामधें बापडा;

होती सर्वहि यत्न निष्फळ, जरी होई विधी वांकडा.



 कृष्णशास्त्री चिपळूणकर

1 December 2011

हिरवें तळकोंकण

सह्याद्रीच्या तळीं शोभतें हिरवें तळकोंकण,
राष्ट्रदेविचें निसर्गनिर्मित केवळ नंदनवन !

झुळझुळ गाणें मंजुळवाणें गात वाहती झरे,
शिलोच्चयांतुनि झुरुझुरु जेथें गंगाजळ पाझरे;

खेळत खिदळत नद्या चालल्या गुणगंभीराकडे
दरिखोर्‍यांतुनि माणिकमोतीं फुलुनि झांकले खडे;

नील नभीं घननील बघुनि करि सुमनीं स्वागत कुडा,
गोमेदांच्या नटे फुलांनी बरसातिंत तेरडा !

कडे पठारीं खेळ मारुतासह खेळे हिरवळ,
उधळित सोनें हसे नाचरें बालिश सोनावळ !

शारदसमयीं कमलवनाच्या तरत्या शय्येवरी
मदालसा स्वच्छंद लोळती जलदेवी सुंदरी !

कविकाव्यांतुनि, तशी जींतुनी स्त्रवते माध्वी झरी,
आमोदा उधळीत फुले ती बकुळीची मंजिरी;

हिरव्या पिवळ्या मृदुल दलांच्या रम्य गालिच्यावरी
स्वप्नीं गुंगति गोकर्णीचीं फुलें निळीं पांढरीं !

वृक्षांच्या राईंत रंगती शकुंत मधु गायनीं
तरंगिणीच्या तटीं डोलती नाग केतकीवनीं !

फूलपांखरांवरुनि विहरती पुष्पवनांतिल परी
प्रसन्नता पसरीत वाजवुनि जादूची पांवरी !

शिताबाइच्या गोड हातचे पोहे जे काननीं
रागानें दे बाइलवेडा कवडा भिरकावुनी,

रोपें त्यांचीं बनुनि पसरलीं नाचत चोहींकडे !
अजुनि पहा या ! मंडित त्यांनीं कोंकणचे हे सडे !

इतिहासाला वार्ता ज्याची श्रुत नाहीं जाहली,
दंतकथांसहि विस्मृति ज्याची होउनियां राहिली,

"झिम्मा खेळे कोंकणचा तो नृपाळ" म्हणती मुली,
"गळे वसंती टपटप जेव्हां आंब्याची डाहळी !"

पिकले आंबे गळुनि भूतळीं रस जोंवरि वाहतो
वनदेवींसह झिम्मा खेळत तोंवरि नृप राहतो

कुठें आढळे फळभाराने लवलेली आंवळी,
कुठें गाळिती भुळभुळ अपुलीं पक्व फळें जांभळी,

कुठें हलवितो पिंपळपाने पिंपळ पारावर,
कुठें वडाच्या पारंबीवर झोंके घे वानर !

कुठें बेहड्यावरि राघूस्तव विरही मैना झुरे,
प्राणविसांवा परत न आला म्हणुनि चित्त बावरे !

मधमाशांची लोंबति पोळीं कुठें सात्त्विणावरी
रंग खेळती कुठें प्रमोदें पांगारे, शेवरी !

पोटीं साखरगोटे परि धरि कंटक बाहेरुनी
झुले कुठें तो फणस पुरातन रहिवासी कोंकणी !

कोठें चिंचेवर शठ आंबा करि शीतळ सांउली,
म्हणुनि कोपुनी नदीकिनारीं रातंबी राहिली !

निर्झरतीरीं रानजाइच्या फुलल्या कुंजांतुनी
उठे मोहमय संगीताचा अस्फुट कोठें ध्वनी !

कुठें थाट घनदाट कळकिचा, त्यांत संचरे कुंणी
पुंगि बजावित फंदि मुशाफर दर्यापुर सोडुनी !

कुठें सुरंगी-मुकुलकुलाच्या सस्मित वदनांतुनी
दरवळलेला परिमळ सेवित फिरति अप्सरा वनीं !

कोरांटीचीं, नादवटीचीं, नेवाळीचीं फुलें
फुलुनि कुठें फुलबाग तयांनीं अवघे शृंगारिले !

नीललोचना कोंकणगौरी घालुनि चैत्रांगणीं
हिंदोळ्यावरि बसविति जेव्हां अंबा शुभदायिनी,

हळदीकुंकू तदा वांटितां नसो प्रसादा उणें,
पिकलीं म्हणुनी रानोरानीं करवंदें तोरणें

औदुंबरतरु अवधूताचा छाया दे शीतळ,
शिवयोग्याचा बेल वाढवी भावभक्तिचें बळ;

बघुनि पांढरी भूतपाळ, वेताळ काढितो पळ,
आइन-किंजळ करिती मांत्रिकमंत्रबळा दुर्बळ !

गडागडावर निवास जेथें माय भवानी करी
राहे उधळित फुलें तिथे खुरचांफा चरणांवरी !

पानफुलांच्या वाहुनि माळा अंजनिच्या नंदना,
तिजवर वरुनी वैधव्याच्या रुइ चुकवी यातना !

'चिंव चिंव' शब्दा करित निंवावर खार भराभर पळे
भेंडि उंडिणींवरी बैसुनी करकरती कावळे;

लज्जारंजित नवयुवतींच्या कोमल गालांसम
रंगुनि काजू, भरले त्यांनीं गिरी डोंगर दुर्गम !

तिथें मंडलाकार मनोहर नर्तन आरंभुनी,
रुसल्या सखिची घुमत पारवा करितो समजावणी !

विविध सुवासीं हिरवा चांफा चकित करी मानस,
मंद मंद मधु गंध पसरितो भुइचांफा राजस,

हंसे उपवनीं अर्धोन्मीलित सुवर्ण चंपककळी,
पाडुनि तुळशीवरी चिमुकली हलती निज सांउली !
केसर पिवळे, धवल पाकळ्या, परिमळ अंबर भरी,
घालित रुंजी भ्रमति भृंग त्या नागचंपकावरी !

सौगंधिक उच्छ्वास सोडिती प्राजक्ताच्या कळ्या,
लाजत लाजत हळुच उघडितां निज नाजुक पाकळ्या

त्या उच्छ्वासां पिउनि बिजेचा चांद हर्षनिर्भरी
होउनियां बेभान नाचतो निळावंतीच्या घरीं !

धुंद सिंधुला मारवेलिची मर्यादा घालुन
उभी सैकतीं कोंकणदेवी राखित तळकोंकण;

निकट माजलीं निवडुंगांची बेटें कंटकमय,
आश्रय ज्यांचा करुनि नांदती कोचिंदे निर्भय,

मागें त्याच्या डुले नारळी-पोफळिचे आगर,
पुढें विराजे निळावंतिचें निळेंच जळमंदिर !

राष्ट्रदेविचें निसर्गनिर्मित ऐसें नंदनवन
सह्याद्रीच्या तळीं शोभतें हिरवें तळकोंकण.



 माधव केशव काटदरे (माधव)
(१९२१)

थोर तुझे उपकार

थोर तुझे उपकार
आई ! थोर तुझे उपकार ll ध्रु० ll

वदत विनोदें हांसत सोडी
कोण दुधाची धार ll १ ll

नीज न आली तर गीत म्हणे
प्रेम जिचें अनिवार ll २ ll

येई दुखणे तेव्हां मजला
कोण करी उपचार ll ३ ll

कोण कड़ेवर घेउनि फिरवी
चित्ती लोभ अपार ll ४ ll

बाळक दुर्बळ होतों तेव्हां
रक्षण केले फार ll ५ ll

त्वांचि शिकविले वाढविले त्वां
आहे मजवर भार ll ६ ll

स्मरण तुझ्या या दृढ़ ममतेचें
होंते वारंवार ll ७ ll

नित्य करावे साह्य तुला मीं
हा माझा अधिकार ll ८ ll



— भास्कर दामोदर पाळंदे


टीप : हि कविता 'विल्यम मावर' यांच्या 'द इंग्लिश स्पेलिंग बुक' या पुस्तकातील "माय मदर" या कावितेचं रुपांतर आहे.

30 November 2011

जिकडे तिकडे पाणीच पाणी

जिकडे तिकडे पाणीच पाणी,
खळखळणारे झरे
झुळझुळणारे गवत पोपटी, 
लवलवणारे तुरे ll

नवी लकाकी झाडांवरती
सुखात पाने-फुले नाहती
पाऊसवारा झेलित जाती
भिरभिरती पाखरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी, 
खळखळणारे झरे ll

हासत भिजती निळसर डोंगर
ड्या त्यांतुनी घेती निर्झर
कडेकपारी रानोरानी
नाद नाचरा भरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी, 
खळखळणारे झरे ll

मधेच घेता वारा उसळी,
जरी ढगांची तुटे साखळी 
हिरव्या रानी ऊन बागडे
हरिणापरी गोजिरे,
जिकडेतिकडे पाणीच पाणी, 
खळखळणारे झरे ll


शंकर वैद्य

फुलपांखरू

(जाति - अंजनी)

जेथें हिरवळ फार विलसते,
लताद्रुमांची शोभा दिसते,
तेथें फुलपांखरू पहा हें
सुंदर बागडतें !

कलिकांवरुनी, पुष्पांवरुनी,
गंधयुक्त अवकाशामधुनी,
पुष्पपरागा सेवित हिंडे –
मोदभरें करुनी !

तरल कल्पना जशी कवीची,
सुंदर विषयांवरुनी साची
भ्रमण करी, गति तशीच वाटे
फुलपांखराची !

वा मुग्धेची जैशी वृत्ति
पतिसहवास स्वप्नावरती
विचरे, फुलपांखराची तशी –
हालचालही ती !

निर्वेधपणें इकडे तिकडे
वनश्रींतुनी अहा ! बागडे;
त्याचा हेवा हृदयीं उपजुनी 
मन होई वेडें !

तिमिरीं आम्हीं नित्य रखडणें,
विवंचनांतचि जिणें कंठणें,
पुष्पपंतंगस्थिति ही कोठुनि
आम्हांला मिळणें !

असे यास का चिंता कांही ?
यास ‘उद्या’चा विचार नाहीं,
अकालींच जो आम्हां न्याया
मृत्युमुखीं पाही !

बहु सौख्याची कुसुमित सृष्टि,
तींत वसे हें, न कधीं कष्टी,
ग्रीष्मांचें खर रुप विलोकी –
नच याची दृष्टि !

‘सर्व विनाशी असती प्राणी,’
ही मज खोटी वाटे वाणी;
फुलपांखरुं मरण पाहिलें
आहे का कोणीं ?

[वसंततिलका]

जें रम्य तें बघुनियां मज वेड लागे;
गाणें मनांत मग होय सवेंचि जागें;
गातों म्हणून कवनीं फुलपांखरातें,
व्हायास सौख्य मम खिन्न अशा मनातें.



केशवसुत

विमान

किति मौज दिसे ही पहा तरी
हे विमान फिरतें अधांतरीं l ध्रु l

खोल नदींतुन कापित पाणी
मत्स्य धांवतों चहुंबाजूंनी,
घारच अथवा फिरते गगनीं,
हुबेहुब हें त्याच परी ll १ ll

रविकररंजित मेघांमधुनी,
स्वच्छ चांदण्यामधें पोहुनी,
घुमघुम नादें दिशा घुमवुनी,
प्रवास करि हें जगावरी ll २ ll

परंतु केव्हा पाउस गारा
प्रांत वेढुनी टाकिती सारा,
त्यांतूनही हें जाइ भरारा,
नवल नव्हे का खरोखरी? ll ३ ll

पहा जाउनी विमानांतूनी,
दिसेल शोभा अपूर्व वरुनी,
डोंगर, रानें, ओहळ, तटिनी
आणि कुठे सागरलहरी; ll ४ ll

ग्रहनक्षत्रें आकाशांतिल
विमान बघुनी मनांत म्हणतिल,
"भेटाया अपणां पृथ्वींतिल
येति माणसें कुणीतरी." ll ५ ll

नको सूर्यचंद्रावर जाया;
नको जगाची सफर कराया,
नेइं विमाना, मज त्या ठायां
जेथ माय मम वास करी ll ६ ll



— गोपीनाथ

29 November 2011

उषा

होतो पुस्तक घेउनि सहज मी दारात त्यांच्या उभा,
बाला तोंच समोरूनि कुणीतरी आली त्वरेने पुढे
वार्‍याने उडुनी पुनःपुनरपी चंद्रास जे झाकिती
मागे सारित-सांवरीत पदरा-ते मोकळे कुंतल,
किंचित हासूनि बोलली मजसि ती अस्पष्ट काही तरी,
किंवा स्पष्ट असेल ते, समजले माते न तेव्हा पण;
होतो स्तब्ध तसाच मी, मजकडे डोळे तिचे लागले;
त्यांचे तेज खुले मुखावरी; रवी जाताच खाली जरा
त्याची मावळती प्रभा पसरूनि रंगे जशी वारूणी,
गोर्‍या, नाजुक या तनूवर तशी शोभे छटा तांबुस;
नाही पार्थीव भाव ज्यास शिवले, स्वर्गीय जे शैशव
त्याची ही रमणीय मूर्तिच उभी माझ्याकडे राहिली.
मी त्यानंतर पाहिले नच तिला, वर्षे किती लोटली?
चित्ताच्या क्षितीजावरून परि ती नाही उषा लोपली.


- ग. त्र्यं. माडखोलकर

अजाण आम्ही तुझी लेकरे

अजाण आम्ही तुझी लेकरे
तू सर्वांचा पिता
प्रेमाने तुज नमितो, गातो
तुझ्या गुणांच्या कथा

चंद्र-सूर्य हे तुझेच देवा
तुझी गुरे वासरे
तुझीच शेते, सागर, डोंगर,
फळे, फुले, पाखरे

अनेक नावे तुला,
तुझे रे दाही दिशांना घरं
करिसी देवा सारखीच तू
माया सगळ्यांवर

खूप शिकावे, काम करावे,
प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा
हीच एक मागणी


— संजीवनी मराठे

24 November 2011

पाणपोई

येइं भाई, येथ पाही घातली ही पाणपोई
धर्म-जाती कोणती ती भेद ऐसा येथ नाही
संसॄतीचा हा उन्हाळा, तल्खली होई जिवाची
स्वेदबिंदू अश्रुधारा याविना पाणीच नाही II १ II

वायुवीची भोंवतीं आंदोलुनी त्या वंचिताती
झोंबती अंगी झळा अन् मूर्छना ये ठायिंठायीं
सांउली नाही कुठेंही, तापतो मार्तंड डोईं
श्रांत पांथा ! बांधली ही तूझियासाठीं सराई II २ II

आद्य जे कोणी कवी तत्स्फूर्तिच्या ज्या सिंधु गंगा
आणिल्या वाहून खांदी कावडी त्यांतील कांही
पांथसेवासाधनीं हे व्हावयातें गार पाणी
मृत्तिकेचे मात्र माझे कुंभ, ही माझी नवाई II ३ II

ओंजळी, दों ओंजळी, आकंठ घेईं वा पिऊनी
हो जरा ताजातवाना, येऊ दे सामर्थ्य पायीं
पावतां तृप्ती मना, संचारतां अंगीं उमेदी
जो दुवा देशील पांथा तेवढी माझी कमाई. II ४ II


— यशवंत

22 November 2011

आजारीपण (पडुं आजारी)

पडुं आजारी,
मौज हीच वाटे भारी II ध्रु. II

नकोच जाणे मग शाळेला,
काम कुणी सांगेल न मजला,
मऊ मऊ गादी निजावयाला,
चैनच सारी..... मौज हीच वाटे भारी II १ II

मिळेल सांजा, साबुदाणा,
खडिसाखर, मनुका बेदाणा,
संत्री, साखरलिंबू आणा;
जा बाजारी..... मौज हीच वाटे भारी II २ II

भवती भावंडांचा मेळा,
दंगा थोडा जरि कुणि केला,
मी कावुनि सांगेन तयाला,
'जा बाहेरी'..... मौज हीच वाटे भारी II ३ II

कामे करतील सारे माझी,
झटतिल ठेवाया मज राजी,
बसेल गोष्टी सांगत आजी,
मज शेजारी..... मौज हीच वाटे भारी ! II ४ II

असलें आजारीपण गोड
असूनि कण्हती कां जन मूढ ?
हें मजला उकलेना गूढ –
म्हणून विचारी..... मौज हीच वाटे भारी II ५ II



- भानुदास

21 November 2011

देवाजीनें करुणा केली

'देवाजीनें करुणा केली,
भातें पिकुनी पिवळी झालीं'

देवाजीनें करुणा केली,
सकाळ नित्याची ही आली
जणुं पायानें चित्त्याच्या अन
रस्ता झाडी झाडूवाली

घराघरांतिल चूल पेटली;
चहा उकळुनी काळा झाला;
जरा चढवितां दुसरें भांडे,
भातहि शिजुनी होईल पिवळा

देवाजीनें करुणा केली:
रोजचीच पण 'बस' हि आली
जणुं पायानें हरिणीच्या अन
शिरस्तांतलीं कामें झाली

घरी परततां, भाजीवाली
समोर दिसली, भरली थैली;
दो दिडक्यांचीं कडू दोडकीं
जरी पिकूनी झालीं पिवळी

उजाडतां जें उजाड झालें,
झोपीं गेलें, मावळतां तें:
करील जर का करुणा देव
बिचकुनि होतिल हिरवीं भातें !


— बा. सी. मर्ढेकर

निजलेल्या मुलास

उठ मुला, उठ मुला,
बघ हा अरुणोदय झाला !

नवरंगी किरणांनी,
भूषविली बघ ही अवनी

मोदभरें, रान भरें,
मंद सुगंधातें विखरे

किलबिलती, बागडती,
झाडांवरती पक्षि किती !

रव करिती भृंगतती,
पुष्पांचा मकरंद पिती

फुलांवरी, फळांवरी,
पतंग मोदें मजा करी !

झटकन् बसे, पटकन् उठे,
उंच भराऱ्याा घेत सुटे !

शितल हा, वात पहा,
आळस हरण्या, येत अहा !

आनंदे, नभ कोंदे,
हरूनी आळसा तरतरि दे

पूर्वेला, रवि आला,
मुला, उठाया कथित तुला !



बालकवी

19 November 2011

तयास मानव म्हणावे का ?

ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुध्दी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का ?

दे रे हरी पलंगी काही
पशूही ऐसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का ?

पोरे घरात कमी नाहीत
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का ?

सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का ?

दुसर्‍यास मदत नाही
सेवा त्याग दया माया ही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव म्हणावे का ?

ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का ?

बाईल काम करीत राही
ऐतोबा हा खात राही
पशू पक्षात ऐसे नाही
तयास मानव का म्हणावे ?

पशु-पक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वानाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का ?


-- सावित्रीबाई फुले

18 November 2011

पसायदान


आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भूतां परस्परे जडो । मैत्र जीवांचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्र्मे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुषी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ।

येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥


रचना - संत ज्ञानेश्वर

16 November 2011

पाऊस कधीचा पडतो

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणीवरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा


 माणिक सी. गोडघाटे उर्फ कवी ग्रेस

वाट

मला आवडते वाट वळणाची
दाट झाडीची नागमोडीची
ही अलिकडची, नदीच्या थडीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
सरघसरणिची पायफसणीची
लवणावरची पानबसणीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
अशी भुलवणिची हुलकावणीची
सागवेळूच्या भर रानीची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
जरा अडचणिची चढउतरणीची
घाटमाथ्याची ती पलिकडची
मला आवडते वाट वळणाची

मला आवडते वाट वळणाची
इथची तिथची कधी कुणिकडची
क्षितिजाकडची पुढची पुढची
मला आवडते वाट वळणाची

— अनिल (आत्माराम रावजी देशपांडे)

15 November 2011

गवताचं पातं

गवताचं पातं वार्‍यावर डोलतं,
डोलतांना म्हणतं खेळायला चला

ऱ्यातलं पाणी खळा-खळा हसतं,
हसताना म्हणतं खेळायला चला

निळं निळं पाखरू आंब्यावर गातं
गाताना म्हणतं नाचायला चला

झिम्मड पावसात गारांची बरसात,
बरसात म्हणते वेचायला चला

छोटासा मोती लपाछपी खेळतो,
धावतांना म्हणतो शिवायला चला

मनीचं पिल्लू पायाशी लोळतं,
लोळतांना म्हणतं जेवायला चला
अहो, जेवायला चला
तुम्ही जेवायला चला


— कुसुमाग्रज

10 November 2011

माझी बाहुली

लहान माझी बाहुली
मोठी तिची साऊली
घारे डोळे फिरवीते
लुकूलुकू हि पहाते

नकटे नाक उडविते
गुबरे गाल फुगविते
दांत काही घासत नाही
अंग काही धूत नाही

इवले घरकुल मांडते
मांडता मांडता सांडविते
पोळ्या केल्या, करपून गेल्या
भात केला कच्चा झाला
वरण केलं पातळ झालं
तूप सगळ सांडून गेलं

असे भुकेले नक्का जाऊ
थांबा करते गोड खाऊ
केळ्याच शिकरण करायला गेली
दोनच पडले दांत
आडाचें पाणी काढायला गेली
धपकन पडली आत !


(अज्ञात कवी)

झुक झुक गाडी

गाडी आली, गाडी आली~~झुक झुक झुक
शिट्टी कशी वाजे बघा~~~~~कुक कुक कुक

ईंजिनाचा धूर निघे~~~~~~~~~~भक भक भक
चाके पाहू तपासून~~~~~~~~~~~~~ठक ठक ठक

गाडीमध्ये बसा चला~~~~~~~~~~~~~~~पट पट पट
सामानही ठेवा सारे~~~~~~~~~~~~~~~~~चट चट चट

तिकिटाचे पैसे काढा~~~~~~~~~~~~~~~~~छन छन छन
गाडीची ही घंटा वाजे~~~~~~~~~~~~~~~~~~घण घण घण

जायाचे कां दूर कोठे~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~भूर भूर भूर
कोठेही जा, नेऊ तेथे~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~दूर दूर दूर

नका बघू डोकावून~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~शुक शुक शुक
गाडी आता निघालीच~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~झुक झुक झुक


— वि. म. कुलकर्णी

(Compiled by : Mr. Pradeep Mandke, Mumbai)

विद्यार्थ्याप्रत

(जाति – महती)

महत्व भारी आहे या पृथ्वीचें,
त्याहुनि अतिशय या सगळ्या विश्वाचें
परि तुजमध्यें महतीचें जें बीज
त्याहुनि कांहीं मोठी नाहीं चीज
ठसव मनीं हें साचें;
बाबा !
हें वच बहु मोलाचें.


अग्नि असे हा तेजस्वी रे फार,
त्याहुनि भारी सूर्य नभीचा थोर;
परि किरण जो तुजमध्यें सत्याचा
प्रकाश सर्वोत्तम तो आहे त्याचा;
घोक सदा हें वाचे,
बाबा !
हें वच बहु मोलाचें.


पृथ्वीमध्यें रत्नें बहु, आहेत;
आकाशी तर असंख्य दिसताहेत;
परि एक रत्न तुजमध्यें जें सच्छील
कोणाला नच सर त्याची येईल;
स्मरण असूं दे याचें,
बाबा !
हें वच बहु मोलाचें.


स्नायूंमध्यें पुष्कळ आहे शक्ति,
नृपवेत्रीं तर फारच आहे म्हणती;
परि एक एक जो नवा शब्द तूं शिकसी
शक्ति तयाची उलथिल सर्व जगासी ! 
पठन तर करीं त्याचें,
बाबा !
जग हें बदलायाचें.



केशवसुत (समग्र केशवसुत)

9 November 2011

आठवणीतील कविता बालभारतीच्या!




मुंबई पाठोपाठ आज लोकसत्ता ठाणे वृत्तान्तने "बालभारती आठवणीतील कविता" ई-पुस्तकाची दखल घेतली.

8 November 2011

बाळ जातो दूर देशा (मातृहृदय)

बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडावून
आज सकाळपासुन

हात लागेना कामाला, वृत्ति होय वेडयावाणी
डोळ्यांचे ना खळे पाणी

आणा दूध जिन्सा नव्या, आणा ताजा भाजीपाला
माझ्या लाडक्या लेकाला

त्याच्या आवडीचे चार, करू पदार्थ सुंदर
कांही देऊ बरोबर

त्याचे बघा ठेविलें कां, नीट सामान बांधून
कांही राहील मागून

नको जाऊ आतां बाळा, कुणा बाहेर भेटाया
किती शिणविसी काया

वार्‍यासारखी धांवते, वेळ भराभरा कशी !
गाडी थांबेल दाराशी

पत्र धाड वेळोवेळी, जप आपुल्या जीवास
नाही मायेचे माणूस

उंच भरारी घेवुन, घार हिंडते आकाशी
तिचे चित्त पिलापाशी

बाळा, तुझ्याकडे माझा, जीव तसाच लागेल
स्वप्नी तुलाच पाहील

बाळ जातो दूर देशा, देवा ! येऊन ऊमाळा–
लावी पदर डोळ्याला



— गोपीनाथ

झुळुक

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

कधि बाजारी तर कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळु थबकत जावे कधी कानोसा घेत
कधि रमत गमत वा कधी भरारी थेट

लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलून बघे तो व्हावे पार पसार
परि जातां जातां सुगंध संगे न्यावा
तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा

गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर
झुळझुळ झर्‍यांची पसरावी चौफेर
शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावे गात

वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज
कणसांच्या कानीं सांगावे हितगूज
शिंपावी डोही फुलें बकुळीची सारी
गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी

दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा
घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा


— दामोदर अच्युत कारे

गाणे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
.वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे.

तळ्याकाठी

अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते
जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून आली असते
जळाआंतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो कांही
गळून पडत असतां पान मुळी सळसळ करीत नाही
सावल्यांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत
उगीच उसळी मारुन मासळी, मधूनच वर नसते येत
पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो
दूर कोपर्‍यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो
हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते,
अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे, मला वाटते!



— अनिल (आ. रा. देशपांडे)

7 November 2011

गालबोट

माझ्या छकुलिचे डोळे,
दुध्या कवडीचे डाव
बाई ! कमळ कमळ,
गोड चिडीचं ग नांव !

जरी बोलते ही मैना,
माझी अजून बोबडे
मला लागती ते बाई,
खडीसाखरेचे खडे !

सर्व्या जगाचं कौतुक,
इच्या झांकल्या मुठीत
कुठें ठेवूं ही साळुंकी,
माझ्या डोळ्यांच्या पिंजर्‍यात !

कसे हांसले ग खुदकुन्,
माझ्या बाईचे हे ओंठ
नजर होईल कोणाची,
लावुं द्या ग गालबोट !



— वि. भि. कोलते (विष्णु भिकाजी कोलते)

जोगिया

कोन्यात झोपली सतार, सरला रंग
पसरली पैंजणे सैल टाकूनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहीले देठ, लवंगा, साली

झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलूनी तू दार दडपिले पाठी

हळुवार नखलिशी पुन: मुलायम पान
निरखीशी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसि काय ते? गौर नितळ तव कंठी
स्वरवेल थरथरे, फूल उमलले ओठी.

साधता विड्याचा घाट उमटली तान
वर लवंग ठसता होसि कशी बेभान?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने
"का नीर लोचनी आज तुझ्या गं मैने?"

त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग
हालले, साधला भावस्वरांचा योग
घमघमे जोगिया दवांत भिजुनी गाता
पाण्य़ात तरंगे अभंगवेडी गाथा

मी देह विकुनिया मागून घेते मोल
जगविते प्राण हे अर्पुनीया 'अनमोल'
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा
ना पवित्र, देही तिळाएवढी जागा

शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम
सावळा तरुण तो खराच गं वनमाली
लाविते पान... तो निघून गेला खाली

अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव
पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
'मम प्रीति आहे जडली तुजवर राणी'

नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळां तिथें हा इष्कां गणितो प्यार;
हासुनी म्हणाले, 'दाम वाढवा थोडा...
या पुन्हा, पान घ्या... निघून गेला वेडा!

राहिलें चुन्याचे बोट, थांबला हात
जाणिली नाहि मी थोर तयाची प्रीत
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येइल भलत्या व्यापाराला?

तो हाच दिवस, हीच तिथी, ही रात
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला

हा विडा घडवुनी करितें त्याचे ध्यान
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगे
वर्षात एकदा असा 'जोगिया' रंगे


— ग.दि. माडगुळकर

मीच माझा एककल्ली

मीच माझा एककल्ली एकटा चालीत गेलो
आडवाटेने पिसाटाच्यापरी बेहोश झालो

ना कुठे आधार आणिक ना गतीला अंत होता
मात्र पायींच्या बळाला जागता आवेग होता

ना क्षिती होती कशाची, मी मला उधळीत गेलो
अन् धुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो

मज कळेना चालतांना दु:ख कैसे फूल झाले
अन् कुणाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले

अक्षरे चुरगाळिता मी अमृताचे कुंभ प्यालो
अन् उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो.


— ना. धों. महानोर (रानातल्या कविता)

केवळ माझा सह्यकडा

भव्य हिमालय तुमचाअमुचा, केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनांत पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हांला, बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला
धिक तुमचे स्वर्गहि साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी वाहतसे लाव्हा सगळा

कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनीं जनार्दन बघणारा तो "एका" हृदयी एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे
इंद्रायणिच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी; जवळिक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले
माझ्यासाठी भीमाकाठीं भावभक्तिची पेठ खुले

रामायण तर तुमचेंमाझे भारत भारतवर्षाचें
छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचें
रजपुतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते
हृदयाच्या हृदयात; परंतू बाजी बाजीची सुचते
अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी
दत्ताजीचे शेवटचे ते शब्द अजुनि हृदयामाजीं
बच जायें तो और लढें
पाउल राहिल सदा पुढे
तुम्हांस तुमचें रुसवेफुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी; राहील गाठीं; मरहट्याचा हट्ट खरा

तुमचें माझें ख्याल तराणे, दोघेही ऐकू गझलां
होनाजीची सोनलावणी वेड लावते; परि मजला
मृदुंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन मुरली
थाप डफाची कडकडतां परि बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो दरी-दरीमधुनी घुमला
उघडुनि माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद
भिंवईवर चढते धुंद
औट हात देहात अचानक वादळ घुसमटुनी जातें
उचंबळे हृदयात पुन्हा तें इतिहासाशी दृढ नातें

कळे मला काळाचे पाउल दृत वेगानें पुढति पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणीं अधिकचि उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझें बाहू पसरुन अवघ्या विश्वातें कवळी
विशाल दारें माझ्या घरची, खुशाल हीं राहोत खुली
मज गरीबाची कांबळवाकळ सकलांसाठी आंथरली
मात्र भाबडया हृदयांत
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करुनि झंझावात
कोटि कोटि छात्यांचा येथे कोट उभारू निमिषांत


— वसंत बापट (सेतू, १९५७)

(Compiled by - Mr. Unmesh, Mumbai and Corrected by - Mr. Shriniwas Kelkar, Pune)

3 November 2011

बालभारती आठवणीतील कविता - वृत्तपत्रांनी घेतलेली दखल




गुरुवार, ३ नोव्हेंबर २०११ रोजी प्रसिद्ध  झालेली  लोकसत्ता, मुंबई वृत्तान्त मधील बातमी.


सोमवार, १७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध  झालेली  महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती मधील बातमी. 

22 October 2011

माधुकरी

गरिब बिचारा माधुकरी, दु:ख तयाला जन्मभरी ll ध्रु. ll

कडक उन्हानें जीव घाबरे, कपोल सुकले घर्मे भिजले
पायी चटके; तापे डोके, धांपा टाकीत पळे जरी ll१ ll

बुरबुर लागे पाऊसधारा, चिखल माखला अंगी सारा
घट्ट तपेली, झोळी धरिली, धांवत जातो घरोघरी ll २ ll

भणभण झोंबे वारा अंगा, बधीर गात्रें पायीं भेगा
हात कांपती, दांत वाजती, कुडकुडतो हा घडी घडी ll ३ ll

विटक्या अपुर्‍या मुकट्यावांचुनी, वस्त्र दुपारी अंगी कोठुनि
हि धार्मिकता लोकांकरितां, नित्य सोशितो कष्ट जरी ll ४ ll

सण आनंदी घरोघरी जरि, नित्य कपाळी सुटे न वारी
शिळी बुरसली, खवट आंबली, अशीच नशिबी सदा भाकरी ll ५ ll

'उशीर' कोठे कुठें 'संपले' मिळे कालवण भाग्य उदेले
नांवा धरिली करी तपेली, अश्रू तोंडी, घांस गिळी ll ६ ll

झोळी थोडिहि अजुनि न भरली, शाळेची तर घंटा झाली
मुख हिरमुसले, घांस कोंबले; दप्तर घेउनि पळे जरी ll ७ ll

शिळे त्यांतले रात्रीकरितां, निजे उपाशी अपुरे पडतां
कुणा कळवळा येई बोला, दु:ख तयाचे अणूपरी ll ८ ll

नंबर गेला एक खालती, जाईल नादारी ही भीती
सांजसकाळी अभ्यासच करि, फुरसत खेळा कुठे तरी ll ९ ll

गोसावी, भट, धन्य भिकारी, तेलंग्याचे भाग्य कितीतरि
पैसा दूरच, पुस्तक धोतर, जुने द्यावया नसे घरी ll १० ll

निजे कुणाच्या ओटीवरती, अर्धे धोतर खाली वरती
एकच सदरा तोच उशाला; दया न येते जगा परी ll ११ ll

यजमानाला पलंग गिरदी, आंत उकडते खुपते गादी
पोटी धरुनी पाय जुळवुनी, कुडकुडतो हा रात्रभरी ll १२ ll

पुण्यांत आला अभ्यासाला, पदोपदी जग अडवी त्याला
विद्या करितो, हाल सोशितो, शूर नव्हे का खरोखरी
गरिब बिचारा माधुकरी? ll १३ ll


- श्रीधर बाळकृष्ण रानडे

नदी आणि कवी

[उपजाति]

असो कवीचें कुल अप्रसिद्ध
होई कवीच्या कवनें प्रसिद्ध
तसा नदीच्या उगमस्थलाला
नदीमुळे गौरवलाभ झाला II१II

काव्यें कवीचीं जगतांत गावी;
त्यांचे न त्यांच्या परि चोज गांवीं.
नदी सुदूरुस्थ जनां पवित्र
विटाळिती तीर्थ तिचेच पुत्र II२II

बाल्यात उच्छॄंखलवृत्ति दोन्ही
ठावा नसे आडथळा म्हणोनी;
लागो दरी खोल, उभा पहाड,
जातात तीं धांवत धाड धाड ! II३II

जाई जसे अंतर होत खोल
गांभीर्य ये वृत्ति निवे विलोल.
रेखून मार्ग क्रमितात संथ
करीत कल्याण जगी अनंत II४II

अभंग त्यांच्या हृदयीं तरंग
नी:संग ते त्यांत सदैव दंग,
गाऊन गाणीं भ्रमतात रानीं,
ते धन्य ज्यांच्या पडतात कानीं II५II

स्वजीवनानें उगवून दाणे,
नदी जिवां दे चिर जीवदानें.
तैसें कवीच्या कविताप्रवाहें
जीवांत संजीवन दिव्य लाहे II६II

राष्ट्रे बुडालीं नृप थोर गेले;
नदी कवी मात्र अनंत ठेले !
भागीरथीला खळ लेश नाही
अखंड रामायण लोक गाई II७II

महाकवी थोर नदाप्रमाणें;
मी बापडा ओघळ अल्प जाणें.
धाकें न ओढा झुळझूळ वाहे
माझी तशी ही गुणगूण आहे ! II८II


— विनायक

(श्री. श्रीकृष्ण जोशी यांच्या मदतीने)

20 October 2011

चाड चातुर्यातें जिणें (विवेकसिंधु)

वेदशास्त्रांचा मथितार्थु l मर्‍हाटिया जोडे फलितार्थु
तरी चतुरीं परमार्थु l कां नेघावा ll १ ll

चाड चातुर्यातें जिणें l यैसें बोलती स्याहाणे
तरी येथिंचिये परमार्थु खुणे l ग्राहिक कां न होआवे ll २ ll

धुळी आंतिल रत्न l जरी भेटे न करितां प्रेत्न
तरि चतुरीं येत्न l कां न करावा ll ३ ll

जर्‍हि रुईचिये झाड़ीं भरती l मधाचिया कावडी
तर्‍हि हिंडावेयाची आडपाडी कां पडों द्यावी ll ४ ll

जर्‍हि हे आरुष बोल l परी रोकडें ब्रह्मज्ञान हेँ नवल
तर्‍हि अवज्ञा कवण करिल l येथ विषई ll ५ ll

ऊंस किरू दिसे काळा l परी घेपे रसाचा गळाळा
तैसे आरुष बोल परि झळाळा l दिसे विवेकाचा ll ६ ll


आद्यकवी - मुकुंदराज



स्याहाणे = शहाणे
प्रेत्न = प्रयत्न
येत्न = यत्न
किरू = वरून
घेपे = वेढणे

निज नीज माझ्या बाळा

बां नीज गडे, नीज गडे लडिवाळा !
निज नीज माझ्या बाळा ।। ध्रु० ।।

रवि गेला रे, सोडुनि आकाशाला,
धन जैसे दुर्भाग्याला.
अंधार वसे चोहिंकडे गगनांत,
गरिबाच्या जेविं मनांत.
बघ थकुनि कसा निजला हा इहलोक,
मम आशा जेविं अनेक.
खडबड हे उंदिर करिती,
कण शोधायातें फिरती,
परि अंती निराश होती;
लवकरि हेही सोडितील सदनाला,
गणगोत जसे आपणांला ।। १ ।।

बहु दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती,
कुजुनी त्या भोकें पडती.
त्यांमधुनी त्या दाखविती जगताला
दारिद्य्र आपुले बाळा.
हें कळकीचें जीर्ण मोडके दार
कर कर कर वाजे फार;
हें दुःखाने कण्हुनि कथी लोकांला
दारिद्य्र आपुले बाळा.
वाहतो फटींतूनि वारा;
सुकवीतो अश्रूधारा;
तुज नीज म्हणे सुकुमारा !
हा सूर धरी माझ्या या गीताला
निज नीज माझ्या बाळा ! ॥ २ ॥

जोंवरतीं हें जीर्ण झोपडें अपुलें
दैवानें नाही पडलें,
तोंवरतीं तूं झोप घेत जा बाळा;
काळजी पुढे देवाला !
जोंवरतीं या कुडीत राहिल प्राण,
तोंवरि तुज संगोपीन;
तदनंतरची करूं नको तूं चिंता;
नारायण तुजला त्राता.
दारिद्रया चोरिल कोण?
आकाशा पाडिल कोण?
दिग्वसना फाडिल कोण?
त्रैलोक्यपती आतां त्राता तुजला !
निज नीज माझ्या बाळा ! ॥ ३ ॥

तुज जन्म दिला, सार्थक नाही केलें,
तुज कांहिं न मी ठेविलें.
तुज कोणि नसे, छाया तुज आकाश;
धन दारिद्र्याची रास;
या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा;
गृह निर्जन रानीं थारा;
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण कांहिं;
भिक्षेविण धंदा नाहिं.
तरि सोडुं नको सत्याला,
धन अक्षय तेंच जीवाला,
भावें मज दिनदयाळा,
मग रक्षिल तो करुणासागर तुजला,
निज नीज माझ्या बाळा ! ॥ ४ ॥


 दत्त (दत्तात्रय कोंडो घाटे) - सन १८९७


(श्री. प्रकाश बाक्रे यांच्या सौजन्याने)

गाणे (ध्वनिमुद्रण) ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
.निज नीज माझ्या बाळा

15 October 2011

देवाचे घर

इवल्या इवल्याशा, टिकल्या-टिकल्यांचे
देवाचे घर बाइ, उंचावरी
ऐक मजा तर, ऐक खरी !

निळी निळी वाट, निळे निळे घाट
निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळ पाट
निळ्या निळ्या आकाशात निळे निळे ढग
निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी

चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी

देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊ मऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्यांची हंडी, चांदण्यांची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी
ऐक मजा तर, ऐक खरी !


ग. दि. माडगूळकर

12 October 2011

जय जवान, जय किसान!

चांद्यापासून बांद्यापर्यंत एक सूर एक ताल
एक गाऊ विजयगान जय जवान, जय किसान!
जय जवान, जय किसान, जय जय!

अखिल देश पाठिशी, 'जवान' व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमि सस्य शामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान!

शत्रू-मित्र जाणुनी, सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू, प्रसन्न देवी अन्नदा
उभ्या जगात आपुली, सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान!

अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी, निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधु आसमान
जय जवान, जय किसान!


— ग. दि. माडगुळकर

(
सौजन्य: आठवणीतली गाणी डॉट कॉम)

7 October 2011

माणूस

प्रवासी मी दिगंताचा
युगे युगे माझी वाट
मज चालायचे असो
सुख, दुःख, माळ, घाट

झेप गरुडाची अंगी
शस्त्र विज्ञानाचे हाती
श्रम-शास्त्राच्या युतीने
पृथ्वी करीन थांबती

चंद्र, सूर्य, ग्रह, तारे
तुडवीन पायदळी
स्वर्गातुनी सुरासुर
पाठवीन मी पाताळी

वारा करीन गुलाम
वर्षा बांधीन दाराशी
माझे वैभव पाहूनी
लक्ष्मी लाजेल स्वतःशी

जे जे असेल अज्ञात
घेता करुनि या ज्ञात
पाठीवरी मात्र हवा
कुण्या प्रेमळाचा हात



— राम मोरे


सागर पालकर यांच्या मदतीने साभार.